गडचिरोली - जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांसह इतरही तालुक्यात गेल्या सप्ताहभरापासून बरसत असलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन बुधवारी पूर्वपदावर आले. भामरागडसह संपर्क तुटलेल्या गावांचे सर्व मार्ग पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.१५ आॅगस्टच्या रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. सुरूवातीचे तीन दिवस दक्षिण भागातील सिरोंचा, भामरागड, अहेरी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातलेल्या पावसाने नंतर जिल्हा व्यापून टाकला. मंगळवारी सायंकाळपर्यंत अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू होती. मंगळवारपर्यंत बहुतांश नद्या व नाल्यांचा पूर उतरला होता. मात्र भामरागडच्या पर्लकोटा नदीचा पूर कायम होता. बुधवारी सकाळपासून हा मार्गही मोकळा झाला.आठवडाभराच्या पावसामुळे दोन ठिकाणी एसटी बस व कार पुराच्या पाण्यात कोसळण्याच्या घटना घडला. सुदैवाने यात जीवित हाणी झाली नाही. अनेक भागांत एका दिवशी २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू आणि शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाच्या निर्देशानुसार नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
गडचिरोलीत पाऊस थांबला : सहा दिवसानंतर जनजीवन पूर्वपदावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 6:34 PM