कुरखेडा (गडचिरोली) : तालुक्यातील सिंदेसूर, पीटेसूर व चारभट्टी परिसरात मागील चार दिवसांपासून पहाटेच्या सुमारास रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यांचाद्वारे धानशेतीचे मोठे नुकसान करण्यात येत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
मागील महिन्यात रानटी हत्तींच्या कळपाने तालुक्यात मालेवाडामार्गे प्रवेश केला होता. मालेवाडा, चिनेगाव, पळसगाव, घाटी, वाघेडा, आंधळी, चिखली, गेवर्धा परिसरातील धानशेतीला जमीनदोस्त करीत हा कळप देसाईगंज तालुक्यात पोहाेचला. यानंतर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुणी तालुक्यातसुद्धा मोठा उपद्रव माजवत पुन्हा गोठणगाव (गोंदिया) वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या नांगलडोहच्या जंगलात पाेहाेचला. सिंदेसूर परिसरात प्रवेश करीत धानपिकाची नासाडी सुरू केली आहे. वनविभागाने याबाबत उपाययोजना करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांनी केली आहे.
६० एकर शेती जमीनदाेस्त
मागील तीन दिवसांत जवळपास ५० ते ६० एकर धानपिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवस व मध्यरात्रीपर्यंत हा कळप गोंदिया जिल्ह्यातील नांगलडोह हद्दीतील जंगलात दडून असते. मात्र, मध्यरात्रीनंतर पहाटे जिल्ह्याची सीमा ओलांडत सिंदेसूर, पीटेसूर व चारभट्टी परिसरात दाखल होत धानपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.