कमलापूर (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पमध्ये तीन वर्षांपूर्वी जन्म घेतलेल्या ‘सई’ नामक हत्तिणीने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ती आजारी असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. यामुळे या हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या आता आठवर आली आहे.
तीन वर्षांपूर्वी बसंती नामक हत्तिणीने सईला जन्म दिला होता. काही दिवसांपासून ती आजारी असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; पण नेमका कोणता आजार होता हे कळू शकले नाही. सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे कळताच सिरोंचावरून उपवनसंरक्षक सुमितकुमार, विभागीय वनाधिकारी एस. एस. पवार, कमलापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी जे. व्ही. घुगे यांनी कमलापूरकडे धाव घेतली. अहेरीतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने तपासणी केल्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
हत्तींच्या देखभालीवर प्रश्नचिन्हविशेष म्हणजे गेल्या वर्षी जून महिन्यात ‘आदित्य’ नावाच्या कमी वयाच्या हत्तीचाही असाच गूढ मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सईचा मृत्यू झाल्यामुळे कमलापूर कॅम्पमधील हत्तींच्या देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कॅम्पमध्ये १० हत्ती होते. आदित्य आणि सईच्या जाण्यामुळे आता ही संख्या आठवर आली आहे.