लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोरगरिबांना वाटण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केलेला शासकीय तांदूळ खासगी व्यापाऱ्याला परस्पर विकण्याचा डाव स्थानिक पोलिसांनी उधळून लावला. यात ४४ हजार ५५० रुपयांचा ३० चुंगड्या तांदूळ (१४.८५ किलो) आणि मालवाहू वाहन असा एकूण ७ लाख ४४ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील व्यापारी हिरण हलदार हा परिसरातील स्वस्त धान्य दुकानातून अवैधरित्या तांदूळ खरेदी करून तो शासनाच्या पोत्यांमधून काढून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून मालवाहू वाहनातून (सीजी ०८- वाय ०३७९) देसाईगंज येथे विक्रीसाठी घेऊन जात होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी देसाईगंज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात वाहनाचा शोध घेतला. अडतिया बाबूराव खरकाटे यांच्या शेडसमोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाची झडती घेतली. मुरूमगाव येथील व्यापारी हिरण हलदार यांच्या दुकानातून आणलेला हा तांदूळ देसाईगंज येथे कोणाकडे द्यायचा हे फोनवरून सांगितले जाणार असल्याचे वाहनचालकाने सांगितले. दरम्यान पोलिसांनी तिथे जाऊन कारवाई केली. यावेळी व्यापारी हलदार यांच्या मोबाईलवर पोलिसांनी संपर्क केला असता तो बंद असल्याचे आढळले. विशेष म्हणजे वाहनचालक किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याकडे त्या तांदळाची पावतीही नव्हती. त्यामुळे तो स्वस्त धान्य दुकानाचा असल्याची खात्री करून पंचनामा केला व तो तांदूळ आणि वाहन जप्त केले.याप्रकरणी आरोपी मुकेश सुरजन मडकाम व रोमेश अमरसाय कोठवार सर्व रा.मुरूमगाव यांच्याविरूद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, हवालदार नरेश सहारे, भाऊराव बोरकर, अंकुश धांडे, रुपाली चव्हाण, चंदू मोहुर्ले आदींनी केली.
गडचिरोलीत गोरगरिबांच्या तांदळाची विक्री करण्याचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:55 AM
गोरगरिबांना वाटण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केलेला शासकीय तांदूळ खासगी व्यापाऱ्याला परस्पर विकण्याचा डाव स्थानिक पोलिसांनी उधळून लावला.
ठळक मुद्दे३० चुंगड्या जप्त देसाईगंज येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई