लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड-कढोली मार्गावरील भालीनबोडी मधील पुलाचे बांधकाम व पाटणवाडा येथील मुख्य रस्त्याच्या लगत नाली बांधकामासाठी कंत्राटदाराने कुठली रेती वापरली, याची चौकशी तलाठ्यांनी केली असता संबंधित कंत्राटदाराने गडचिरोली येथील रेतीच्या टिप्या दाखविल्या आहेत. सदर कामासाठी खरोखरच कंत्राटदाराने गडचिरोलीची रेती वापरली काय, याचा शोध घेण्याचे आव्हान तलाठ्यांसमोर निर्माण झाले आहे.भालीनबोडीमधील पुलाच्या बांधकामासाठी तसेच पाटणवाडा येथील नालीच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने जवळपास १०० ट्रॅक्टर रेतीचा वापर केला. ही सर्व रेती चोरून वापरण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन तलाठी कंत्राटदाराकडे गेला असता, कंत्राटदाराने १० रॉयल्ट्या गडचिरोली येथील रेती घाटाच्या असल्याचे दाखविले. कंत्राटदाराच्या या रॉयल्ट्यांवर तलाठ्यांनी विश्वास ठेवत त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. वास्तविक या कामासाठी कंत्राटदाराने चोरीची रेती वापरली ही बाब तलाठ्यालाही चांगल्या पध्दतीने माहित आहे. मात्र कारवाई करण्याची हिंमत दाखवित नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित दोन कामांसाठी १०० ब्रॉस रेती लागली. केवळ १० टिप्या आढळून आल्या. उर्वरित ९० ट्रिपा रेती आली कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाठ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेतीची प्रचंड प्रमाणात चोरी सुरू आहे. वैरागड परिसरातील वैरागड-मानापूर रेती घाट, करपडा रेती घाट, वैरागड चामोर्शी माल रेती घाट, कराडी येथील रेती घाट या घाटांचा लिलाव झाला नाही. मात्र या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. नदीतून रेती उपसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदी घाटात खड्डे पडले असल्यास रस्ता तयार करण्यासाठी झाडे तोडून त्यामध्ये टाकली जातात. रेती तस्कर दुसरीकडे झाडांचीही कत्तल करीत आहेत.
वैरागडातील बांधकामासाठी गडचिरोलीतील रेतीचा वापर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 10:53 PM
वैरागड-कढोली मार्गावरील भालीनबोडी मधील पुलाचे बांधकाम व पाटणवाडा येथील मुख्य रस्त्याच्या लगत नाली बांधकामासाठी कंत्राटदाराने कुठली रेती वापरली, याची चौकशी तलाठ्यांनी केली असता संबंधित कंत्राटदाराने गडचिरोली येथील रेतीच्या टिप्या दाखविल्या आहेत.
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्तानंतर चौकशी । घाट तयार करून केली जात आहे रेतीची तस्करी