- संजय तिपालेगडचिरोली - जिल्हा पोलिस दलाच्या वतीने भरती प्रक्रिया सुरु असून शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची २८ जुलैला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, परीक्षेसाठी निघालेल्या २९ जणांची पुरानेही परीक्षा घेतली. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान त्यांच्या मदतीला धावले व त्यांना पुरातून बाहेर काढत परीक्षेसाठी मार्गस्थ केले.
जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस शिपाई पदाच्या ९१२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या ६ हजार ७११ उमेदवारांची लेखी परीक्षा २८ जुलै रोजी गडचिरोली शहरात ११ केंद्रांवर होणार आहे. यासाठी जिल्हाभरातून उमेदवार शहरात येत आहेत. मात्र, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेला असल्याने तेथील २९ उमेदवारांची मोठी अडचण झाली होती. याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाल्यावर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक रवान केले. भामरागड येथून २३ तर कुंभी मोकासा (ता. गडचिरोली) येथून ६ उमेदवारांना नावेतून नदी ओलांडून सुरक्षित बाहेर आणले व गडचिरोलीला रवाना केले.
दिवसभरात ५९ जणांच्या मदतीला बचाव पथकदरम्यान , शनिवारी दिवसभरात ५९ जणांच्या मदतीला बचाव पथक धावून गेले. गडचिरोली तालुक्यातील कुंभी मोकासा येथून वैद्यकीय सुविधेची गरज असलेल्या २ महिला, एक अंध व्यक्ती ह्यांना नदीच्या पुरातून बोटीद्वारे सुखरूप काढून गडचिरोली मुख्यालयी पोहचविण्यात आले. रानमूल ( ता. गडचिरोली) येथील पूराच्या पाण्यात वेढेलेल्या २ व्यक्तींच्या मदतीलाही पथक धावून गेले.