गडचिरोली : स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला गडचिरोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २५ वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. देसाईगंजमध्ये राहणाऱ्या नराधम पित्यानं घरी कुणी नसल्याची संधी साधून स्वत:च्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपी बापास गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी शिक्षा सुनावली. १२ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता पीडित मुलीची आई ही आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेली होती. यावेळी वडिलाने आपल्या मुलाला पेट्रोल घेण्यास बाहेर पाठवले. यावेळी पीडित मुलगी घरातील भांडे घासत होती. आरोपी बापाने तिचा हात धरून तिला बाथरूममध्ये नेले. त्यानंतर बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने ही सर्व हकीकत बाजारातून घरी आलेल्या आपल्या आईला सांगितली. पीडित मुलगी व आईने लागलीच देसाईगंज पोलीस ठाणे गाठून आरोपी बापाविरूद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३७६, ३७७ व बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांची जबानी व वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी आरोपी बापास ३७६ कलमान्वये १० वर्षांचा सश्रम कारावास, १० हजार रूपये दंड, कलम ३७७ अन्वये पाच वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रूपये दंड, तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलमान्वये १० वर्षांचा सश्रम कारवास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अनिल प्रधान यांनी काम पाहिले.