एक गाव, एक गणपतीच्या संकल्पनेत : तंटामुक्त गाव समित्यांचा पुढाकारगडचिरोली : गावात एकात्मता व शांतता टिकून राहावी, या उद्देशाने राज्य शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून एक गाव, एक गणपती ही संकल्पना सुरू केली आहे. सदर संकल्पना अधिकाधिक गावात साकारण्यात यावी, यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येते. यंदाच्या गणेश उत्सवात एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारण्यात गडचिरोली पोलीस उपविभाग अव्वल ठरला आहे. गडचिरोली उपविभागाअंतर्गत सर्वाधिक ५८ गावांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे एकाच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या गावांमध्ये तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने एक गाव गणपतीची संकल्पना राबविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १९२ गावांमध्ये ही संकल्पना यंदा साकारण्यात आली आहे. प्रत्येक गावात गटातटाचे राजकारण चालत असते, विशेष म्हणजे सार्वजनिक उत्सवात दोन ते तीन गटांकडून गणेश उत्सवाची स्पर्धाही केली जाते. दरम्यान यामुळे गावाची एकात्मता धोक्यात येते. एकात्मतेला धोका पोहोचू नये, या उद्देशाने राज्य शासनाने एक गाव, एक गणपतीची संकल्पना अंमलात आणली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात सर्वत्र गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा गडचिरोली पोलीस उपविभागाअंतर्गत घोट पोलीस मदत केंद्राअंतर्गत १६, चामोर्शी पोलीस ठाण्याअंतर्गत १०, पोटेगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत ५, आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत १६ व गडचिरोली पोलीस ठाण्याअंतर्गत ११ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारण्यात आली आहे. धानोरा पोलीस उपविभागातील गावांमध्ये एकूण २५ गावांत एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारण्यात आली आहे. यामध्ये धानोरा पोलीस ठाण्याअंतर्गत ८, मुरूमगाव ५, चातगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत १० व येरकड पोलीस मदत केंद्राअंतर्गत २ गावांमध्ये ही संकल्पना राबविली जात आहे. अहेरी उपविभागाअंतर्गत पेरमिली पोलीस ठाण्याअंतर्गत १, मुलचेरा पोलीस ठाण्याअंतर्गत १५ व आष्टी पोलीस मदत केंद्राअंतर्गत ७ अशा एकूण २३ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत आहे. सिरोंचा पोलीस उपविभागाअंतर्गत एकूण २८ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारण्यात आली आहे. यामध्ये सिरोंचा पोलीस ठाण्याअंतर्गत १२, रेगुंठा ७, बामणी ७ व आसरअल्ली ठाण्याअंतर्गत २ गावांमध्ये ही संकल्पना साकारण्यात आली आहे. पेंढरी कॅम्प कारवाफा पोलीस उपविभागाअंतर्गत ११ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत आहे. देसाईगंज पोलीस उपविभागाअंतर्गत मालेवाडा पोलीस मदत केंद्राअंतर्गत १०, पुराडा मदत केंद्राअंतर्गत १०, कुरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत ६ व देसाईगंज पोलीस ठाण्याअंतर्गत १३ अशा एकूण ३९ गावांमध्ये ही संकल्पना साकारण्यात आली आहे. एटापल्ली पोलीस ठाण्याअंतर्गत ४ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना यंदा साकारण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारणारी गावे वाढली आहेत.
गडचिरोली उपविभाग अव्वल
By admin | Published: September 08, 2016 1:39 AM