अहेरी , गडचिरोली: नाेकरी मिळणे हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असताे. मात्र नाेकरीवर रूजू हाेण्याच्या काही दिवसांपूर्वीच जर युवकाचा मृत्यू झाला तर ही बाब त्या कुटुंबासाठी धक्कादायक असते. हे दु:ख पचवणे त्या कुटुंबासाठी असह्य हाेते. अशीच घटना अहेरी येथील राजू बाेम्मावार यांच्या कुटुंबाबत घडली. नाेकरीवर रूजू हाेण्याच्या काही दिवसापूर्वीच त्यांचा मुलगा तेजसचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
तेजस राजू बाेम्मावार (२२) मृतक युवकाचे नाव आहे. तेजस पुणे येथे एमबीएचे शिक्षण घेत होता. दिवाळी निमित्त तो अहेरी येथे आला. दिवाळीच्या दिवशी घरी पूजा असल्याने वडील राजू बोम्मावार, आई आणि अन्य सर्व नातेवाईक नदीतील पाणी व रेती आणण्यासाठी वांगेपल्ली जवळील प्राणहिता नदी घाटावर गेले हाेते. त्यात तेजस भावंडांसह आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचायला काही जण धावून गेले मात्र नदीच्या प्रवाहात ताे वाहून गेला. पोलीस निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. बाेटीच्या सहाय्याने त्याचा शाेध घेतला. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह चिचगुंडी येथे मासेमारांच्या जाळीत अडकला हाेता.