शहरवासीय धास्तावले : घरी, कपाटात रोकड व ऐवज नव्हता; कुटुंबीयांच्या सतर्कतेने नुकसान टळलेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या चार-पाच दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी गडचिरोली शहराच्या विविध वार्डात धूमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास घरी कुटुंबीय नसल्याचे पाहून अशा घरी चोरटे चोरीचा प्रयत्न करीत आहेत. मात्र घरातील कपाटात रोकड तसेच दागिणे व तत्सम ऐवज ठेवण्यात न आल्याने नागरिकांचे नुकसान टळले आहे. गडचिरोली शहरात मोठी चोरी झाली नसली तरी अनेक घरी कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे शहरवासीय धास्तावले आहेत.चामोर्शी मार्गावरील कन्नमवार नगरातील रहिवासी कविश्वर बनपूरकर यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी कुलूप फोडून आत प्रवेश केला. मात्र कपाटात रोकड तसेच दागिणे नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. याबाबतची माहिती बनपूरकर यांनी गडचिरोली पोलिसांना दिली आहे. कॅम्प एरियातील तीन ते चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र येथेही चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. चोरीचा प्रयत्न झाला असला तरी संबंधित कुंटुंबीयांनी पोलिसांत लेखी तक्रार नोंदविली नाही.रात्रीची गस्त वाढवाकाही दिवसांपूर्वी राधे बिल्डींगच्या मागील परिसरातील कन्नमवार वार्डात एका घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे हॅन्डल तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथेही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. शहराच्या बहुतांश भागात चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
गडचिरोली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 12:57 AM