२५ व २६ ला आयोजन : संमेलनाध्यक्षपदी प्रा. मोहिते यांची निवड गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते राहणार असून उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मोटे उपस्थित राहणार आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे. परंतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. गेल्या १५-२० वर्षात देशात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभाविपणे उमटलेले आढळत नाही. शेतकरी आत्महत्यांवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरीबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर उपाययोजनांची चाचपणी करून जाणीवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्य विश्वात उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्य क्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे. साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. सात परिसंवाद होणार ४दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान व शासकीय धोरण, मराठी साहित्यावर सोशल मीडियाचा प्रभाव, राज्य घटनेतील परिशिष्ट ९ व कायद्याचे जंगल, शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेती यशोगाथांचे गौडबंगाल, पारंपरिक लोकगिते : ग्रामीण स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन आदी विषयावर परिसंवाद होतील.
तिसरे शेतकरी साहित्य संमेलन फेब्रुवारीला गडचिरोलीत
By admin | Published: December 29, 2016 1:29 AM