लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयामुळे तिथल्या स्त्रियांना दुष्परिणाम भोगावे लागतील. शिवाय तिथून गडचिरोली जिल्ह्यात दारू आयात होईल. त्यामुळे गडचिरोलीच्या जनतेला व दारूबंदीला धोका निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी जिल्हा दारूमुक्ती संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून कळविले. शिवाय गडचिरोलीतील १०५० गावांनी शासनाला दारूबंदी हवीच, अशी निवेदने पाठविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र शासन, स्वयंसेवी संस्था व गावागावातील जनता यांच्या सहयोगाने ‘मुक्तीपथ’ अभियान सुरू आहे. ‘पेसा’ कायद्याअंतर्गत ग्रामसभांना संवैधानिक अधिकार असल्याने गावातल्या लोकांनी विशेषत: महिलांनी सामूहिकरीत्या ६०० गावात दारूविक्री बंद केली आहे. १०५० गावांनी जिल्ह्यात दारूबंदी हवीच, ती अजून मजबूत करा, अशी निवेदने पाठविली. महिलांनी अहिंसक कृती करून गावातील बेकायदेशीर दारूवर आळा घातला असल्याने जिल्ह्यात दारू पिण्याचे प्रमाण दारूबंदीपूर्वीच्या तुलनेत ७० टक्के कमी झाले असल्याचे डॉ. बंग यांनी कळविले. जिल्ह्यात ४८ हजार पुरुषांनी दारू पिणे सोडले असल्याचा दावाही त्यांनी केला.