- गाेपाल लाजूरकरगडचिराेली - वाघ अचानक समाेर आला तर माणूस गर्भगळीत हाेऊन आपला जीव नक्की जाणार, याच भीतीने भेदरताे. जर वाघाने हल्ला केला तर ताे जगण्याची आस साेडताे; परंतु हिमतीने वाघाचा प्रतिकार केला तर ताे त्यावर मात करू शकताे. असेच एकट्या गुराख्याने वाघाशी दाेन हात करीत कुऱ्हाड भिरकावून त्याला पिटाळून लावल्याची घटना आरमाेरी तालुक्याच्या पळसगाव कक्ष क्रमांक ८९ मध्ये गुरुवार १७ ऑगस्ट राेजी दुपारी ३ वाजता घडली. वाघाशी झालेल्या झटापटीत गुराखी किरकाेळ जखमी झाला.
रवींद्र धाेंडाेबा पुसाम (४९) रा. कासवी, असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. कासवी येथील गुराखी रवींद्र पुसाम हे गावापासून दीड कि. मी. अंतरावर असलेल्या जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी एकटेच गेले हाेते. याच परिसरात गेल्या पाच वर्षांपासून अनेक वाघांचा वावर आहे. पुसाम हे जंगलात एकटेच गुरे राखत असताना टी-१ वाघाने लपत-छपत येऊन त्यांच्यावर समाेरून हल्ला केला. तेव्हा पुसाम यांनी घाबरून वाघाला पाठ दाखवली. याचाच फायदा घेत वाघाने त्यांच्यावर झडप घातली. पुसाम हे खाली काेसळले व त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता सर्वप्रथम हातातील कुऱ्हाड भिरकावली व ते उठून उभे झाले. ताेपर्यंत वाघ काही फूट अंतरावर गेला. वाघानेही पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पुसाम यांनी हातातील काठीने त्याचा प्रतिकार केला. हिमतीने त्यांनी वाघाशी दाेन हात केल्याने वाघाने माघार घेत झुडपाच्या दिशेने पळ काढला. झालेल्या झटापटीत पुसाम यांच्या उजव्या हाताच्या पंजात वाघाची नखे रुतली. तसेच पाठीवर नखाच्या दाेन जखमा झाल्या व काही ओरपडे पडले. त्यानंतर लगेच त्यांनी आपल्या मुलाच्या माेबाइलवर संपर्क साधून माहिती दिली. मुलाने त्याच परिसरात शेळ्या चारणाऱ्या अन्य लाेकांना सांगून घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली व पुसाम यांना घरी आणले. वाघासारखी हिंमत ठेवल्याने वाघाच्या तावडीतून पुसाम यांचा जीव वाचला.प्रकृती धोक्याबाहेर; दाेन हजारांची मदतवाघाचा हल्ला झाल्याची माहिती मिळताच आरमाेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम व वनपाल मुखरू किनेकर, वनरक्षक रूपा सहारे यांनी कासवी गाव गाठून रवींद्र पुसाम यांना आरमाेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. तत्पूर्वी पुसाम यांच्या मुलाकडे दाेन हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
व्याघ्र संरक्षक दल बंद का केले?पळसगाव व कासवी परिसरातील नागरिकांना जंगलात कोणत्याही कामानिमित्त जाण्यास व गुरे चराईसाठी बंदी आहे. २९ ऑगस्ट २०२२ रोजी जोगीसाखरा बिटात कक्ष क्रमांक ४७ मध्ये नरभक्षक वाघाने बळीराम कोलते या शेतकऱ्याचा बळी घेतला होता. तेव्हा वाघावर देखरेख ठेवणारे व्याघ्र संरक्षक दल हाेते; परंतु हे दल बंद केल्याने लाेकांना वाघाचे लाेकेशन आता माहीत हाेत नाही.