धानोरा (गडचिरोली) : तेंदूपत्ता हंगामापूर्वी जंगलात तेंदू झाडांची खुटकटाई करण्यासाठी गेलेल्या ११ जणांपैकी गाव पाटलाला पकडून जंगलात नेऊन नक्षल्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. दुरगुराम चैनू कोल्हे (४५) रा.कटेझरी असे त्या गाव पाटलाचे नाव आहे.काही दिवसांतच तेंदूपत्ता हंगाम सुरू होणार आहे. झाडाला नवीन व चांगली पाने लागण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी खुट कटाई केली जाते. मंगळवारी गाव पाटील कोल्हे यांच्यासह कटेझरी येथील एकूण ११ जण ोलियाच्या जंगलात गेले होते. यावेळी एक सशस्त्र महिला नक्षलवादी आणि तीन साध्या वेषातील नक्षलवादी तिथे आले. त्यांनी कोल्हे यांना सोबत चलण्याचे फर्मान सोडून जंगलात नेले. तिकडेच चाकूने व दगडासारख्या जड वस्तूने मारून त्यांची हत्या केली आणि मृतदेह कटेझरी-देवसूर मार्गावर आणून टाकला. विशेष म्हणजे नक्षल्यांनी ही हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ चिठ्ठी वगैरे सोडून हत्येचे कोणतेही कारण दर्शविलेले नाही. मात्र तेंदूपत्ता मजूर व कंत्राटदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गडचिरोलीत गाव पाटलाची नक्षल्यांकडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:08 PM