लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या संचारबंदीमुळे राज्यासह देशातील अनेक उद्योगधंदे बंद पडले. परिणामी हजारो कामगार बेरोजगार झाले. भामरागड येथील बचत गटाच्या महिलाही कोरोना महामारीच्या प्रभावाने बेरोजगार झाल्या. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. माविमच्या मार्गदर्शनातून त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करून रोजगार मिळविला आहे. ख्रिस्ती बचत गटाच्या महिला परिसरातील चार ते पाच गावांमध्ये सायकलने फिरून भाजीपाल्याची विक्री करीत आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत भामरागड येथे त्रिवेणी संगम लोकसंचालित साधन केंद्र कार्यान्वित आहे. त्या केंद्राद्वारा ख्रिस्ती बचत गटाची स्थापना करण्यात आली. सदर गटातील महिला बीपीएलधारक असून सर्व आदिवासी आहेत. सदर बचत गटाच्या महिलांनी भामरागड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपहार गृह सुरू केले होते. मात्र कोरोनाच्या महामारीने हे उपहार गृह सध्या बंद पडले आहे. परिणामी बचत गटाच्या महिला बेरोजगार झाल्या. त्यानंतर दुसरा व्यवसाय शोधणे आवश्यक होते. दरम्यान माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांनी त्रिवेणी संगम लोकसंचालित साधन केंद्राला भेट दिली. मिश्रा यांनी बचत गटाच्या महिलांना व्यवसाय बदलवून भाजीपाला विक्री व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. संकटासमोर हात न टेकवता महिलांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला महिलांनी स्वत:कडील निधीतून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्रिवेणी संगम लोकसंचालित साधन केंद्राने बँकेतून सदर बचत गटातील महिलांना ३० हजार रुपयांचे कर्ज काढून दिले.
या रकमेतून महिलांनी कॅरेट, किलो काटा व व्यवसायासाठी लागणारे इतर साहित्य खरेदी केले. मार्र्कंडा येथून ठोक दरात भाजीपाला खरेदी करून भामरागड शहरानजीकच्या चार ते पाच गावांमध्ये किरकोळ पध्दतीने भाजीपाला विक्री सुरू आहे. बचत गटाच्या चार महिला दररोज सायकलने फिरून भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. ख्रिस्ती महिला बचत गटाच्या अध्यक्ष सन्नो रैनू मज्जी यांनी सर्वप्रथम पुढाकार घेऊन भाजीपाला विक्रीच्या कामास सुरूवात केली.
दररोज मिळतो ५०० रुपयांचा नफाठोक स्वरूपात भाजीपाला खरेदी करून त्याची किरकोळ पध्दतीने विक्री करण्याचा व्यवसाय ख्रिस्ती बचत गटाच्या महिलांनी सुरू केला आहे. सदर गटाचे दररोजचे उत्पन्न ५०० रुपये इतके आहे. सदर भाजीपाला विक्री व्यवसायाला जेमतेम १५ दिवस झाले आहे. आतापर्यंत या बचत गटाला १५ हजार रुपयांचा शुध्द नफा झाला आहे. आता सदर गटातील इतर महिला सुध्दा सायकलने भाजीपाला विकून हा व्यवसाय वाढविणार आहे. व्यवसायाच्या माध्यमातून भामरागडसारख्या दुर्गम भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर झाल्या आहेत.