- दिलीप दहेलकर गडचिरोली - मुलचेरा तालुक्याच्या गीताली गावात दारूमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर आळा घालण्यासाठी दारूविक्री बंद करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात येताच गावातील महिलांनी गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचा विळा उचलला आहे. आतापर्यंत गाव संघटनेने मुक्तिपथ व पोलिस विभागाच्या सहकार्याने वेगवेगळया दिवशी कृती करून ५६ ड्रम सडव्यासह २२० लिटर दारू नष्ट केली आहे. तसेच अनेक दारू विक्रेत्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
शांतीग्राम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गीताली या गावात आयोजित गावसभेत दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांनी गावात फेरी काढली. सोबतच दारूविक्रेत्यांच्या घरावर धडक देऊन विक्रेत्यांना नोटीस बजावीत दारूविक्री बंद करण्याची सूचना केली. तसेच दारूविक्रेत्यांना नोटीस सुद्धा बजावली. तरीसुद्धा गावातील काही विक्रेत्यांनी जंगल परिसरात मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी विविध दिवशी अहिंसक कृती करीत विक्रेत्यांचा आतापर्यंत ५६ ड्रम मोह सडवा व २२० लिटर दारू नष्ट केली.
गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचा विळा गाव संघटनेच्या महिलांनी उचलला आहे. त्याअनुषंगाने महिलांची मोहीम सातत्याने सुरू असून दारू विक्रेत्यांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. या मोहिमेत ग्रा.पं.सदस्य सिमा मजुमदार, पोलिस पाटील बील्लो विश्वास, पौर्णिमा बैरागी, ग्राम संघ सचिव रेणुका मुखर्जी, शांती नितीन जोद्दार, पिंकी मंडल, विशाखा सरदार, पार्वती रप्तान, शांती धिरेन जोद्दार, ममता सरकार, शिखा विश्वास, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, स्पार्क कार्यकर्ती समिक्षा कुळमेथे यांच्यासह गाव संघटनेच्या महिला सदस्य सहभागी झाल्या.