गडचिरोली : गडचिरोलीजिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या आणि एका महिला कर्मचाऱ्याचा सातत्याने विनयभंग करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) ओंकार अंबपकर यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्यांची तत्काळ विभागीय चौकशी सुरू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी बुधवारी केली. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
अंबपकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यामुळे कार्यालयातील वातावरण दूषित आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी असुरक्षित होते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वीकारले.
निवेदन देताना अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक सुनील चडगुलवार, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस दुधराम रोहणकर, विशाखा समितीच्या अध्यक्ष अर्चना इंगोले, महिला समितीच्या माया बाळराजे, अपर्णा पातकमवार, मोनाक्षी डोहे, लतीफ पठाण, किशोर सोनटक्के, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव फिरोज लांजेवार, रितेश वनमाळी, स्नेहलता बोरकर, वासंती देशमुख व बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अंबपकर होणार निलंबित
कॅफो अंबपकर यांच्यावर लवकरच प्रशासकीय कारवाई करून विभागीय चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांनी दिले. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे आणि अशा काही घटना घडू शकतात असे वाटल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
४८ तास पोलिस कोठडीत राहिलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित करता येते. पण वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. गुरुवारी तसा प्रस्ताव जाईल. वरिष्ठांनी सूचना केल्यास मी तत्काळ निलंबनाचा आदेश काढेन.
- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.