गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून वैनगंगा नदीपात्रातील पाणी योजनेच्या इंटेक व्हेल व जॉकवेल विहिरीतील गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता पोकलॅन्ड मशिनने विहिरीलगतच्या पात्रातील रेती उपसा करणे तसेच रिकाम्या सिमेंटच्या पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधण्याचे काम शिल्लक आहे. सदर काम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोलीकरांची तब्बल आठ दिवसानंतर पाणीटंचाईच्या समस्येतून मुक्तता होणार आहे.शहरातील पाणीटंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, पाणीपुरवठा सभापती नंदू कायरकर व नगराध्यक्षांचे पती रामकिरीत यादव यांनी मंगळवारी नळ योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी पालिकेचे अभियंता पुनवटकर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शेंडे व काम करणारे कर्मचारी व मजूर उपस्थित होते. नदीकाठावर असलेल्या मोठ्या टाकीतील गाळ उपसा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. नदीपात्रातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पालिकेच्या वतीने केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. सखल भागात दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईमुळे महिलांचा त्रास वाढला आहे. आठ दिवसानंतर ही समस्या मार्गी लागणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)टिल्लूपंपधारकांवर कारवाई करणार४यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. परिणामी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शहरातील सर्व नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी टिल्लूपंपधारकांविरोधात कारवाईसत्र सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी पालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गडचिरोलीकरांची पाणीटंचाईतून होणार मुक्तता
By admin | Published: March 16, 2016 8:36 AM