गडचिरोली : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी क्रीडा गटातून येथील एंजल विजय देवकुले हिची निवड झाली आहे. येत्या २४ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात होणा-या समारंभात तिला या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो. इयत्ता पाचवीत शिकत असलेली एंजल ही येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी आहे. स्कॉय मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात एंजलने जिल्हा ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ४० सुवर्णपदके पटकावली असून १२ विविध रेकॉर्ड तिने नोंदविले आहेत. तिला संदीप पेदापल्ली यांच्याकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण मिळाले आहे.पुरस्कारासाठीच्या निकषानुसार जिल्ह्याचे खासदार अशोक नेते आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी तिच्यासाठी शिफारसपत्र दिले होते. देशभरातून आलेल्या २५ हजारांपेक्षा जास्त नामांकनांमधून एंजलची निवड झाली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील बालिकेची प्रथमच या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
गडचिरोलीच्या एंजल देवकुलेची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 6:16 PM