लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस आणि पंचायत समिती सभापतीला लक्ष्य करून घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव गावकरी आणि पोलिसांच्या सतर्कतेने उधळून लावण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मुरुमगाव येथील वस्तीत नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले दोन भूसुरुंग सकाळी 8 वाजताच्या सुमारास बाहेर काढून निष्क्रिय केले. यामुळे गावकऱ्यांसह पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.धानोरा तालुक्यातल्या मुरुमगाव येथील पोलीस मदत केंद्रापासून 800 मीटर अंतरावर नागरी वस्तीमधे असलेल्या हातपंपाजवळ रविवारी सायंकाळी काही मुलांना जमिनीतून केबल बाहेर आल्याचे दिसले. जवळच पंचायत समितीचे सभापती अजमन रावते आणि पोलिसांच्या सी-60 पथकातील कर्मचाऱ्याचे निवासस्थान आहे. या संशयास्पद प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता भूसुरुंग पेरले असल्याचा संशय बळावला. पण गडचिरोलीवरून रात्रीच बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचारण करून त्या ठिकाणी पाहणी करणे धोक्याचे असल्याने सकाळी पथकाला बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान पहाटेच संपूर्ण परिसर रिकामा करून बॉम्ब शोधक-नाशक पथकाने मोठ्या शिथापीने दोन सुरुंग बाहेर काढून सकाळी 8 वाजताच्या सुमारास ते निष्क्रिय करण्यात यश मिळविले. यामुळे रात्रभर जागे असणाऱ्या गावकऱ्यांचा आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.