लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. व लॉ. च्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश केला आहे.गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत संलग्नित असलेल्या महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह समाजामध्ये विवेकनिष्ठा, बुद्धीप्रामाण्यवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी विद्यापीठाने बी.ए. तृतीय वर्ष व विधीशास्त्राच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा अंतर्भाव केला आहे. बी.ए.तृतीय वर्षाच्या समाजशास्त्र विषयात सहाव्या सेमिस्टरसाठी दोन युनिटमध्ये जादुटोणा विरोधी कायद्याच्या अभ्यासक्रमाबाबत काही भाग समाविष्ट केला आहे.पाच वर्षीय विधीशास्त्र अभ्यासक्रमाच्या दहाव्या सेमिस्टरसाठी संपूर्ण दोन पाठ जादुटोणा विरोधी कायद्यासंबंधीत आहेत. तशी माहितीही गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए.समाजशास्त्र विषय घेतलेले तसेच विधीशास्त्राला प्रवेश घेतलेले विद्यार्थी जादुटोणा विरोधी कायद्याचे अध्ययन करणार आहेत.जादुटोणा विरोधी कायद्याच्या गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठाच्या विधीसभेचे सदस्य अॅड.गोविंद भेंडारकर यांनी केली होती. ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारी सदस्य म्हणून कार्यरत असून या समितीच्या चंद्रपूर शाखेचे अध्यक्षही आहेत.गोंडवाना विद्यापीठाने अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश केल्याने या विद्यापीठाला पुरोगामी विद्यापीठ म्हणता येईल.
अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होणारअंधश्रद्धेतून आजारावर उपचार न करणे, भोंदूबाबाच्या मागे लागून फसवणूक करून घेणे, गुप्त धनासाठी विकृत प्रकार करणे, नरबळी आदीसारखे प्रकार घडत आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश करण्यात आल्याने विद्यार्थी आपल्या कुटुंबासह समाजात ज्ञानाचा वापर करू शकतात. परिणामी जनजागृती करून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यास मदत होणार आहे. शिवाय समाजातील अंधश्रद्धाही दूर होण्यास मदत होईल.