लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आदिवासी गोवारी जमात संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष विनायक वाघाडे यांच्या नेतृत्वाखाली आरमोरी मतदारसंघातील आदिवासी गोवारी जमात बांधवांनी दि. ११ रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या पोटगाव येथील घराला घेराव घालून मागण्या मांडल्या .मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दि.१४ आॅगस्ट २०१८ ला गोवारी हे आदिवासीच आहेत असा ऐतिहासिक निर्णय दिला. दोन महिन्याचा कालावधी लोटूनसुध्दा अध्यादेश काढून गोवारी जमातीला न्याय दिला नाही. न्यायालयाच्या निर्णयानुसार सद्यास्थितीत गोवारी जमातीला अजुनपर्यंत गोंडगोवारी म्हणून जातीचे दाखले व जात वैद्यता प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढला नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ अध्यादेश काढावा, आतापर्यंत १७० जात प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र दिले आहेत त्याप्रमाणे दाखले देण्यात यावे. केंद्र सरकारकडे आदिवासी गोवारी जमातीचे दुरुस्तीची शिफारस करण्यात यावी, सुप्रीम कोर्टात अपिल करण्यात येऊ नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी शासन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहानुभूतीपूर्व प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. आपल्या मागण्या घेऊन आपण स्वत: मुख्यमंत्री यांच्याशी भेटणार असल्याचे आमदार कृष्णा गजबे यांनी आश्वासन दिले.