गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातल्या झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यकलावंतांनी महाराष्ट्र गाजविला आहे. मात्र थेट चंदेरी दुनियेत प्रवेश करून एखाद्या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका मिळण्यापर्यंतचे यश आतापर्यंत कोणाला लाभले नव्हते. पण सोमवारपासून एका मराठी टिव्ही वाहिनीवर सुरू झालेल्या 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत गडचिरोलीची कन्या थेट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रतीक्षा शिवणकर असे तिचे नाव आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असलेल्या सुनील आणि भारती शिवणकर या शिक्षक दाम्पत्याची प्रतीक्षा ही ज्येष्ठ कन्या. चवथीपर्यंतचे शिक्षण जि.प.शाळेत तर दहावीपर्यंतचे शिक्षण तिने चामोर्शीतील शिवाजी हायस्कूलमधून घेतले. बारावी चंद्रपूरवरून आणि ग्रॅज्युएशन नागपूरच्या आंबेडकर कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर प्रतीक्षा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात गेली. तिथेच अभिनय, नृत्याच्या हौसेने तिला आधी व्यावसायिक रंगभूमी आणि आता छोट्या पडद्यावर पोहोचविले.
प्रशांत दामले यांच्यासोबत प्रतीक्षाने 'एका लग्नाच्या पुढची गोष्ट' या नाटकाचे देश-विदेशात ५०० प्रयोग केले. पुढे याच रंगभूमीने जीवनाचा साथीदारही मिळवून दिला. सकाळी ६ पासून रात्री ११ पर्यंत शुटींगच्या कामात व्यस्त असताना पतीसह (डॉ. अभिषेक साळुंखे) सासू-सासऱ्यांकडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असल्याचे प्रतीक्षाने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करा
- जीवनात मोठे स्वप्न पाहिलेच पाहिजे आणि ते स्पप्न सत्यात उतरविण्यासाठी धडपडही केली पाहिजे. हिरोईन वगैरे बनण्याचे माझेही स्वप्न होते. अभिनयाची आणि नृत्याची आवडही आधीपासून होती. मी प्रयत्न केले आणि त्याला योग्य दिशा मिळाली. असे प्रतीक्षाने सांगितले.
- आई-वडीलांचे कायम पाठबळ आणि कोणतीही गोष्ट माझ्यावर न लादता मला माझे करिअर निवडण्यासाठी दिलेले प्रोत्साहन यामुळेच मी हा आतापर्यंतचा अभिनयाचा प्रवास करू शकले, असे प्रतीक्षा सांगते.
पुण्यात आली अन् जीवनाला कलाटणी मिळाली
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पुण्यात प्रशांत दामले यांच्या संस्थेत ऑडिशन दिली. त्यात ती पास झाली. ३ महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तिच्यातील टॅलेंट पाहून पुन्हा एक वर्षांचे प्रशिक्षण तिला निःशुल्क देण्यात आले. पुढे दामले यांनीच तिला नाटकाची ऑफर दिली. 'कॉलेज डायरी' नावाचा एक चित्रपटही तिने केला. याशिवाय एका कॉमेड शो मध्येही भूमिका केली. पण आता मराठी मालिकेतील भूमिका तिला घराघरात पोहोचवेल, असा विश्वास तिच्यासह तिचे चाहतेही व्यक्त करत आहेत.