लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : रोहिणी नक्षत्राच्या दोन-तीन वेळच्या पावसाने शेतकरी भाळला आणि मृगाच्या पूर्वीच पेरणी सुरू केली. मृगारंभ सुद्धा पावसाने झाल्यामुळे घाईघाईत चिखल पेरणीही झाली. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला. पऱ्हे करपायला लागताच ऐनवेळी तारणारा पाऊस आला. मृग संपून आर्द्रा लागला खरा पण अख्ख्या नक्षत्रात फक्त पाचवेळा पाऊस आल्यामुळे आर्द्राच्या पाण्याने रोवणी सुरू करण्याची बळीराजाची तीव्र आस सरतेशेवटी घात करणारी ठरली. विशेष म्हणजे, जास्त पावसाचे मृग, आर्द्रा ही दोन्ही नक्षत्रे संपूनही गाढवी नदीचा पाणी प्रवाह बंद झाला आहे.पावसाचा आर्द्रा नक्षत्र संपला. आधीचा मृगही निराशादायी गेला. रोहिणी आणि मृग या दोन्ही नक्षत्रात आलेल्या हलक्या, मध्यम पाण्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आधी धूळ आणि नंतर आली धान पेरणी पूर्ण केली. पण मृगाच्या उत्तरार्धात पऱ्हे संकटात येताच आर्द्राच्या दुसऱ्या, तिसऱ्यां दिवशीच्या पावसामुळे जगली. इथूनच पऱ्हे धोक्यात आणि शेतकरी अधिक चिंतातूर झाला. त्यानंतर सातव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी आलेल्या पाण्याने पऱ्ह्यांना निव्वळ नवसंजीवनी मिळाली. मात्र पुन्हा पाऊस गायब झाला. यावेळी धान पऱ्हे रोवणीयोग्य झाली आहेत. रोवणीसाठी वाफे तयार आहेत, पण पाऊस नाही. पाऊस आला नाही तर वाफे करपून दुबार पेरणी करावी लागेल, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर विसंबून असणाऱ्या शेतातील ही परिस्थिती आहे.दोन जिल्ह्यातून वाहणारी गाढवी नदी विसोरा जवळून जाते. गाढवी नदीच्या दोन्ही किनाऱ्यालगत शेकडो हेक्टर शेतजमिनीवर धानाची शेती केली जाते. यात खरिपा सोबतच उन्हाळी पीक बहुतेक शेतकरी घेतात. यासाठी कृषी मोटर पंपचा वापर केला जातो. शेतातील पिकांना हजारो, लाखो लिटर पाणी गाढवी नदीतून ओढला जातो. गाढवी नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना ही जीवनदायिनी व अर्थदायिनी आहे. स्वत: पाण्याला वाहत नेणारी ही गाढवी नदी लोकांचे स्थिर जीवन सुध्दा वाहत (चालवत) नेत आहे.गाढवी नदी इथल्या लोकांच्या जीवनचक्रात खोलवर रुजली आहे. परंतु यंदा मृग आणि आर्द्रा ही नक्षत्रे निराशाजनक अशी पावसाविना संपल्याने गाढवी नदीचा पाणी प्रवाह बंद झाला. नदीतील पाणी प्रवाह थांबल्याने काठावर असलेल्या शेतातील धान रोवण्या लांबणीवर जाण्याची शक्यता असून शेतकरी चिंतातूर आहे. नदीसह नाले, तलाव, बोड्यांमध्ये कमी प्रमाणात पाणी असून रस्त्याकडेचे खड्डे पाण्याशिवाय कोरडे आहेत.दमदार पावसानंतरच रोवणी हंगामफक्त पावसाच्या पाण्यावर असलेल्या शेतातील धान पऱ्हे रोवणीयोग्य होऊनही पाऊस दमदार पडल्यावरच रोवणी सुरू होईल. दुसरीकडे शेतात जलसिंचनाची सोय उपलब्ध आहे,अशा शेतामध्ये धानपीक रोवणी सुरू झाली असून महिला, पुरुषांना रोजगार मिळाला आहे. आधुनिक अशा श्री, पट्टा पद्धतीने रोवणी करीत आहेत.
पावसाचे दोन नक्षत्र संपूनही गाढवी नदी कोरडीठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM
मृगाच्या उत्तरार्धात पऱ्हे संकटात येताच आर्द्राच्या दुसऱ्या, तिसऱ्यां दिवशीच्या पावसामुळे जगली. इथूनच पऱ्हे धोक्यात आणि शेतकरी अधिक चिंतातूर झाला. त्यानंतर सातव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी आलेल्या पाण्याने पऱ्ह्यांना निव्वळ नवसंजीवनी मिळाली. मात्र पुन्हा पाऊस गायब झाला. यावेळी धान पऱ्हे रोवणीयोग्य झाली आहेत. रोवणीसाठी वाफे तयार आहेत, पण पाऊस नाही.
ठळक मुद्देवरपाण्याची शेती अडचणीची, आर्द्रात केवळ पाच दिवस पाऊस; ऐनवेळी पाणीप्रवाह झाला बंद