मागीलवर्षी काही अटी-शर्ती ठेवून प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीला शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला होता. पण या शैक्षणिक वर्षात अजूनपर्यंत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शाळा सुरू करण्याच्या हालचाली शासनाकडून दिसत नाहीत. त्यामुळे इयत्ता १ ते ४ वर्गामधील विद्यार्थ्यांचे पालक अधिकच चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाने अनलॉकची घोषणा केली होती. पण लोकांची वाढती गर्दी पाहता, कोरोनाचा प्रभाव वाढेल या भीतीने शासनाने जुनेच नियम लागू केले आहेत. परिणामी माध्यमिक व प्राथमिक शाळा सुरू होण्यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासन निर्देशानुसार काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरू केले आहेत. शाळेकडून दिलेल्या वेळेवर हे वर्ग सुरू होत असले तरी, घरी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चामोर्शी तालुक्यात शेतकरी, शेतमजूर, कारागीर आणि इतर मजूर वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहींचे तर हातावर पोट आहे. त्यात सध्या पालकांच्या हाताला काम नसल्याने संसाराची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच स्मार्ट फोन आणि त्यात इंटरनेट घेण्याचा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे. या ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी मुलांना येत आहेत. त्या फक्त प्रत्यक्ष शाळेतच सोडवल्या जाऊ शकतात. त्यामुळे शिक्षकही आता शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष आता शासनाच्या निर्देशाकडे लागले आहे.
बाॅक्स
१ ते ४ वर्गाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी
मागीलवर्षी २३ नाेव्हेंबरपासून टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू केलेल्या होत्या. पण या टप्प्यामध्ये इयत्ता १ ते ४ च्या वर्गांचा समावेश नव्हता. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शेकडो इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत शाळेचे तोंड सुध्दा बघितलेले नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पाया प्रत्यक्ष वर्गामध्येच मजबूत होत असतो. पण या वर्गातील विद्यार्थी शााळेमध्ये कधी येतील, याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. त्यामुळे लवकरात लवकर इयत्ता १ ते ४ वर्गांच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.
(बॉक्स)
या आहेत अडचणी...
एक तर ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यामुळे परिसरातील काही विद्यार्थी एकत्र येऊन हे ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर्ग सुरू झाल्यानंतर मध्येच नेटवर्क गेल्यास विद्यार्थी बुचकळ्यात पडतात, तर कधी सुरुवातीपासूनच नेटवर्क राहत नसल्याने सुरू होणारा ऑनलाईन वर्ग दिसण्यास अडचण निर्माण होत आहे. वर्ग सुरू झाला तर शिक्षकांचा आवाज मध्येच गायब होतो. दोन-चार विद्यार्थी एकत्र दिसल्याने त्यांच्या गोंधळात या ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे.