गडचिरोली : गावात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात लढा देण्यासाठी कोणत्या कायद्यांचा आधार घ्यावा, या संदर्भातील कायद्यांची माहिती देणारी पुस्तिका मुक्तिपथमार्फत सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या विविध गावांतील पोलिस पाटील, सरपंच व गावसंघटनेला भेट देण्यात आली.
अवैध दारू व तंबाखूविरोधात लढा देण्यासाठी सुरू असलेल्या मुक्तिपथ अभियानात प्रमुख सहभाग हा जनतेचा आहे. त्यामुळे गावसंघटनेच्या सदस्यांना दारू व तंबाखूवर प्रतिबंध लावण्यासाठी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पुल्लीगुडम, रमेशगुडम, किष्टयापल्ली, कोर्ला, कोपेला यांसह विविध गावांतील गावसंघटन, सरपंच, पोलिस पाटील यांना माहितीपुस्तिका देण्यात आली.
या माहितीपुस्तिकेमध्ये दारूबंदी कायद्याची प्रमुख कलमे व कायदे, पेसा कायदा १९९६, ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावात दारूविक्रीबंदी अधिनियम, सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखाबंदी कायदा- २०१२, अल्पवयीन मुलांसाठी संरक्षण कायदा - २०१५, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ कोटपा, महाराष्ट्र राज्य अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६, साथरोग प्रतिबंध कायदा, आदी कायद्यांची विस्तृत अशी माहिती आहे. सोबतच कायद्याचा आधार घेऊन अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुक्तिपथ तालुका चमूतर्फे करण्यात आले.