आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्याच्या अगदी बाजूला कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे स्वच्छतेची वाट लागत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना तसेच स्पर्धा आयोजित करून गावांमध्ये स्वच्छता राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गावकरी गावात स्वच्छता ठेवत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांकडे पाळीव जनावरे आहेत. या जनावरांचे मलमूत्र टाकण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे जागा नसल्याने सदर मलमूत्र रस्त्याच्या कडेला टाकले जात आहे. या ढिगांमुळे स्वच्छतेच्या मोहिमेवर पाणी फेरत आहे. अनेक गावे स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात. मात्र, गावात असलेल्या खड्ड्यांमुळे या गावांना कमी गुण मिळत आहेत. खड्डे उचलण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. मात्र, काही गावांमध्ये अजूनही खड्डे कायम आहेत.
सिमेंटच्या टाक्यात कचरा टाकण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. मात्र, नागरिकांत जागृती नसल्याने अजूनही रस्त्याच्या कडेला खड्डा खोदून त्यामध्ये कचरा टाकला जात आहे. पावसाळ्यात याचा प्रचंड त्रास नागरिकांना होताे.