लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे स्वयंपाक महागला आहे. याचा फटका जिल्ह्यातील तीन लाख कुटुंबांना बसणार आहे. तसेच १ एप्रिलपासून विजेचे दर प्रति युनिट ६० पैशांनी वाढवत असल्याचेही परिपत्रक महावितरणने काढले आहे. याची झळ अडीच लाख वीज ग्राहकांना सोसावी लागेल. या दोन निर्णयांमुळे नवीन आर्थिक वर्षात सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.
अपवाद वगळता प्रत्येक कुटुंबाकडे गॅस सिलिंडर आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील काही कुटुंबे चुलीवर स्वयंपाक करतात. मात्र, शहरी भागातील नागरिकांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय राहत नाही.
गॅससाठी आता मोजा ९०९ रुपये
- गडचिरोली शहरात गॅस सिलिंडर ८५९ रुपयांना उपलब्ध होत होते. शासनाने त्यात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९०९ रुपये मोजावे लागणार आहेत.
- उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ६० हजार कुटुंबांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. या कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळत होता. आता त्यासाठी ५५० रुपये मोजावे लागणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी गरीब आहेत. रिकामे सिलिंडर घरी ठेवून ते चुलीवर स्वयंपाक करीत होते. आता पुन्हा गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.
वापर वाढला, दरही वाढलेएप्रिल महिन्यापासून उकाडा वाढला असल्याने विजेचा वापर वाढला आहे. महावितरणने दर वाढविल्याने अधिकचे बिल ग्राहकांना मोजावे लागणार आहे. महावितरणने दरवाढ केली. मग चांगली सेवा देणार काय? असा प्रश्न आहे.
"शहरात गॅसशिवाय स्वयंपाक शक्य नाही. त्यामुळे गॅस ही शहरी भागातील कुटुंबांची गरज आहे. गॅसच्या किमतीत वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या बजेटवर होतो. शासनाने गॅसच्या किमती वाढवू नये, अशी अपेक्षा आहे."- भूमिका वासेकर, गृहिणी, आरमोरी
"चैनीच्या वस्तूंवर विविध प्रकारचे कर लादून त्यातून शासन कर गोळा करू शकते. गॅस ही अत्यावश्यक गरजांमध्ये मोडते. त्यामुळे गॅसच्या किमती वाढणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे."- सपना धोटे, गृहिणी, पालोरा