एटापल्ली : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गाभण असलेल्या गाईची सिजेरियन प्रसूती करून तिला जीवदान देण्यात आले.तालुक्यातील डुम्मी येथील मधुकर रैणुजी पुंगाटी या पशुपालकाची गाय गाभण होती. गाभणकाळ पूर्ण होऊनही गायीची नैसर्गिक प्रसूती झाली नाही. त्यामुळे पशुपालक पुंगाटी चिंताग्रस्त होते. दरम्यान त्यांनी आपली गाय तत्काळ एटापल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणली. येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. यू. बी. सोनटक्के यांनी या गायीची तपासणी केली. यावेळी या गायीच्या पोटातील वासरू मृतावस्थेत असल्याचा अंदाज आला. त्यांनी तत्काळ या गाईची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करून मृत वासराला बाहेर काढले. यामुळे गाईला जीवनदान मिळाले. सध्या गाईची प्रकृती स्थिर आहे. अवघड शस्त्रक्रिया केल्यामुळे पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनटक्के यांचे परिसरातील पशुपालकांनी कौतुक केले आहे. सिजेरियन प्रसूतीच्या वेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक बाबुराव पेगडपल्ली, विश्वनाथ दहागावकर, अकलेश झाडे, बारसागडे, बावणे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शस्त्रक्रियेने गाईला जीवदान
By admin | Published: May 19, 2016 1:05 AM