२०१७ मध्ये एट्टापल्ली तालुक्यातील गट्टा,जांभिया, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली, उडेरा या संयुक्त ग्रामसभांच्या युनिटचे तेंदुपत्ता लिलावाद्वारे कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले होते. गोंदिया येथील स्नेहल पटेल, एम.जी.पटेल आदी कंत्राटदारांनी करार केले होते. मात्र, पाच वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामसभांची कोट्यवधी रुपयांची रक्कम संबंधित कंत्राटदारांनी दिलेली नाही. चालू हंगामातील राॅयल्टी कंत्राटदारांकडून रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून कंत्राटदारांनी वेळोवेळी टाळाटाळ केल्याने कोट्यवधी रुपयांची राॅयल्टीची रक्कम थकीत आहे. थकीत असलेल्या तेंदुपत्ता राॅयल्टीमध्ये संयुक्त ग्रामसभा गट्टाचे १ कोटी ५६ लाख ५६ हजार,जांभिया १ कोटी १५ लाख ७३ हजार ३३४ रुपये, गर्देवाडा १ कोटी १३ लाख ५० हजार ६६० रुपये,वांगेतुरी १ कोटी २९ लाख ६ हजार ६६० रुपये, जवेली १ कोटी २५ लाख ८० हजार तर उडेरा ८९ लाख ३५ हजार रुपये राॅयल्टी रक्कम कंत्राटदारांकडून मिळालेली नाही. तर २०१९ च्या हंगामाचे अहेरी तालुक्यातील संयुक्त ग्रामसभा येरमनार यांचे २६ लाख २५ हजार रुपये राॅयल्टी रक्कम सावली येथील अमन ट्रेडर्सचे मालक अमन सुधाकर बोरकर यांनी जमा केलेली नाही. ही रक्कम तत्काळ वसूल करुन देण्यात यावी, अशी मागणी जयश्री वेळदा, शेकापचे जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर यांनी केली आहे.
तेंदूपत्ता राॅयल्टीची रक्कम मिळवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:08 AM