गडचिराेली : जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांची हजेरीपटावर पूर्वीप्रमाणे स्वाक्षरी घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. काेराेनाच्या कालावधीपासून सर्वच आराेग्य कर्मचाऱ्यांच्या हजेरीपटावर उपस्थितीबाबतची स्वाक्षरी घेणे प्रतिबंधित करण्यात आले हाेते. मात्र, आता काेराेनाची साथ आटाेक्यात आल्याने सफाई कामगार वगळता इतर सर्व आराेग्य कर्मचाऱ्यांची हजेरीपटावर स्वाक्षरी सुरू करण्यात आली आहे. परंतु, सफाई कामगारांना अजूनही हजेरीपटावर स्वाक्षरी करण्यावरील प्रतिबंध कायम आहेत. हजेरी हाेत नसल्याने भविष्यात सफाई कामगारांचे आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सफाई कामगार कामावर उपस्थित नसतानाही त्यांची हजेरी लावली जात आहे. तसेच सफाई कामगारांचे भविष्यात आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता असल्याने सफाई कामगारांची हजेरीपटावर स्वाक्षरी घेणे सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष याेगेश साेनवाने, माजी जिल्हाध्यक्ष छगन महाताे, उपाध्यक्ष सुभाष महानंदे, वामन गेडाम आदी उपस्थित हाेते.
सफाई कर्मचाऱ्यांची हजेरीपटावर स्वाक्षरी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:37 AM