दोन वर्षांपासून प्रभारी एसडीओ : विकास कामांवर होतोय परिणामएटापल्ली : तत्कालीन काँग्रेस-राकाँ आघाडी सरकारने अहेरी उपविभागाचे विभाजन करून भामरागड व एटापल्ली या दोन तालुक्यासाठी १ मे २०१२ रोजी महाराष्ट्रातील एटापल्ली येथे स्वतंत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मिती केली. मात्र येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचे पद दोन वर्षांपासून रिक्त असून सदर उपविभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे एटापल्ली व भामरागड या दोन्ही तालुक्यातील विकासकामे प्रचंड मंदावली आहेत. चार वर्षांत केवळ दोनच नियमित मिळाले एसडीओएटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात चंद्रभान पराते व आयएएस दर्जाचे राहूल रेखावार हे दोनच अधिकारी दीड वर्षांसाठी नियमित एसडीओ म्हणून कार्यरत होते. तर तब्बल दोन वर्ष प्रभारी अधिकाऱ्यांनीच एटापल्लीचा उपविभाग सांभाळला. डी. एम. कांबळे, उदय चौधरी, जितेंद्र पाटील हे तिन्ही अधिकारी प्रभारी म्हणूनच एटापल्लीच्या उपविभागाला मिळाले. नियमित एसडीओ देण्याची मागणी प्रलंबितच आहे. उपविभागीय अधिकारी हे सर्व विभागाचे प्रमुख असतात. त्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच वनहक्क पट्टे देणे, आदिवासींची जमीन खरेदी-विक्री तसेच परवाना देणे, भोगवटदार वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करणे, कृषक जमिनीचे अकृषक करणे, पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविणे, तलाठी पदभरती प्रक्रिया व बदली प्रक्रिया राबविणे आदी महत्त्वाची कामे उपविभागीय अधिकाऱ्यांना करावी लागतात. विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी हे रोजगार हमी योजना समितीच्या अध्यक्षस्थानी असतात. मात्र एवढे मोठे महत्त्वाचे पद असतानाही एटापल्ली उपविभाग २८ फेब्रुवारी २०१४ पासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. त्यामुळे विकासकामांचा दावा करणाऱ्या विद्यमान सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अहेरी उपविभागाच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचेही सातत्याने दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)अहेरीचे एसडीओ सांभाळतात एटापल्लीचा कारभारअहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडेच एटापल्ली उपविभागाच्या एसडीओ पदाचा प्रभार होता. त्यांची बदली ३१ आॅक्टोबर २०१५ ला झाल्यानंतर एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांच्याकडे एटापल्ली व अहेरीच्या उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय एटापल्ली या नवनिर्मित नगर पंचायतीचे प्रशासक म्हणूनही खलाटे काम सांभाळत आहेत. २० दिवस काम सांभाळल्यानंतर तलाठी यांच्याकडून एसडीओ प्रभार काढण्यात आला. आता अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे एटापल्ली उपविभागीय कार्यालयाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे २८फेब्रुवारी २०१४ पासून एटापल्ली उपविभागीय कार्यालयाला स्वतंत्र एसडीओ मिळाले नाही.
एटापल्ली उपविभागाला स्वतंत्र एसडीओ मिळेना
By admin | Published: July 08, 2016 1:31 AM