परधान समाजाची सभा : ऊर्जा व उद्योग विभागाच्या सहसचिवांचे प्रतिपादन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : समाजाच्या प्रत्येक घटकाने आपल्यामध्ये वैचारिक परिवर्तन करण्याची गरज आहे. येणारा काळ आपल्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला नियोजनात्मक भूमिका व संघटित होऊन सामाजिक कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा व उद्योग मंत्रालयाचे सहसचिव अशोक आत्राम यांनी केले. अखिल भारतीय आदिवासी परधान समाज संघटना महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी स्थानिक पत्रकार भवनात जिल्हास्तरीय कार्यकारिणीचे गठन व चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अखिल भारतीय आदिवासी परधान समाज संघटनेचे राज्याध्यक्ष दिनेश मडावी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रंजना कोडापे, दलितमित्र प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, देसाईगंजच्या सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनिता मरस्काल्हे, भोलाजी मडावी, बंडू सोयाम, विलास मडावी, डी. एन. मडावी उपस्थित होते. या वेळी राज्य अध्यक्ष दिनेश मडावी यानी समाजाच्या विकासासाठी राजकारणापेक्षा अधिक प्रभावीपणे आपल्याला समाजकारण करायच आहे. सामाजिक कार्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यानी केले. उपस्थित इतर मान्यवरांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता मरस्कोल्हे यांनी केले तर संचालन हरीश सिडाम यांनी केले. कार्यक्रमाला समाजाचे नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी रोशन मसराम यांची निवड झाली. तर राज्य महिला अध्यक्षपदी सुनीता मरस्कोल्हे यांची निवड राज्य अध्यक्ष दिनेश मडावी यांनी केली.
आव्हानांसाठी संघटित व्हा
By admin | Published: May 28, 2017 1:25 AM