आरमोरीत गोटूल महोत्सवाचे उद्घाटन : वसंत पुरके यांचे आदिवासींना आवाहनआरमोरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, आदिवासी, दीनदुबळ्या लोकांचा संविधानातील मूलभूत सूचित अंतर्भाव करून त्यांना आरक्षणाचा घटनादत्त अधिकार दिला. मात्र आदिवासी समाजाला मिळालेल्या आरक्षणावर डोळा ठेऊन बोगस जाती खऱ्या आदिवासींमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासींचे आरक्षण हिरावू पाहणाऱ्या गैरआदिवासींना शासन संरक्षण देण्याचे काम करीत आहे. आरक्षण हा आपला हक्क असून तो कुणालाही हिरावू देणार नाही, हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी एकजूट होऊन संघटितपणे लढा देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. गोटूल बहुउद्देशीय समिती व आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गोटूल भूमीवर गुरूवारी आयोजित गोटूल महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. पुरके बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, ज्येष्ठनेते सुधीर भातकुलकर, माजी जि. प. सदस्य पी. आर. आकरे, विभागीय समाजकल्याण अधिकारी आर. डी. आत्राम, वेणू ढवगाये, भूवैज्ञानिक तुकेश सयाम, जि. प. सदस्य सुकमा जांगधुर्वे, भाऊराव मरापे, दत्ताजी मालगडे, डॉ. आशिष कोरेटी, सुकरंजन उसेंडी, मुक्तेश नरोटे, संदीप ठाकुर, प्रा. दौलत धुर्वे, बाळू मडावी, संदीप गरफडे, प्रा. हंसराज बडोले उपस्थित होते. बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचे काम १९९५ मध्ये युती सरकारने केले. त्यानंतर पुन्हा आता सत्तेत आलेल्या सरकारने बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. आदिवासी, दलित समाजाला मिळालेले आरक्षण संपविण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. त्यामुळे याविरोधात संघटित होऊन संघर्ष करावा, असे आवाहन शिवाजीराव मोघे यांनी केले. महोत्सवात सुकरंजन उसेंडी, तुकेश सयाम, डॉ. आशिष कोरेटी, शालू पदा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. दौलत धुर्वे, संचालन भावेश उईके यांनी केले. प्रा. दिलीप कुमरे, दिलीप कोडाप, राम वालदे, दिलीप घोडाम, गोटूल समिती व आविसंच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
अधिकार रक्षणासाठी संघटित व्हा
By admin | Published: December 26, 2015 1:36 AM