शस्त्राच्या जोरावर दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून अत्याचार व लूटमार केल्याने आदिवासी जनता नक्षलवाद्यांवर नाराज आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल दलममध्ये भरती होण्यास कोणीही तयार नाही. परिणामी छत्तीसगडच्या भैरामघाडी या आदिवासी भागातील गरीब आदिवासींना भूलथापा देऊन दलममध्ये भरती करत आहेत. तेंदूपत्ता ठेकेदार, बांबू ठेकेदार, बांधकाम ठेकेदार आणि ग्रामसभांकडून खंडणी वसूल करून नक्षलवाद्यांचे वरिष्ठ नेते व त्यांचा परिवार अलिशान जीवन जगत आहेत. नक्षलवाद्यांनी माओवादी विचारसरणी सोडून आणि शस्त्र खाली ठेवून लोकशाहीच्या मार्गाने शरण आले नाही तर सामान्य जनताच नक्षलवाद्यांविरूद्ध एल्गार पुकारतील, असा इशाराही पोलीस विभागाने दिला आहे.
(बॉक्स)
२२ पदाधिकाऱ्यांची हत्या
एटापल्ली व भामरागड तालुक्यांमध्ये लोकशाही मार्गाने जनतेने निवडून दिलेल्या आतापर्यंत २२ अनुसूचित जाती-जमातीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली आहे. यावरून नक्षलवादी हे जनतेच्या हक्काबद्दल फक्त बोलतात, प्रत्यक्षात मात्र आदिवासी जनतेला त्यांच्या हक्कांपासून वंचितच ठेवत असल्याचे पोलीस विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.