लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या नक्षल प्रभावित व दुर्गम भागात सोयी-सुविधा नसतानाही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत १ लाख ५६ हजार ३५७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ५३ हजार ५०२ अर्ज राज्यस्तरावर पडताळणी करून पाठविण्यात आलेले आहेत. या अर्जाची राज्यस्तरावर निधी वितरणाकरिता पडताळणी करण्यात आली; परंतु सुमारे २० हजार महिलांचे खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याचे (ई-केवायसी) नसल्याचे आढळून आले आहे. तरीसुद्धा बुधवार, १४ ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यावर दोन महिन्यांचे ३ हजार रुपये वितरणास सुरूवात झालेली आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपये याप्रमाणे निधी वितरीत केला जाणार आहे. याची कार्यवाही १४ ऑगस्टपासून केली जाणार असली तरी १७ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुणे जिल्ह्याच्या बालेवाडी येथील कार्यक्रमातून पात्र महिलांना निधी वितरीत केला जाणार आहे. ज्या महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाही, अशा महिलांनी बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे किंवा ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे
महिलांनो, ई-केवायसी केली आहे का?ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही. त्यांनी स्वतःचे मूळ आधार कार्ड, बँक पासबुक, जन्मतारखेचा पुरावा व स्वतःचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा मोबाइल घेऊन आपले खाते असलेल्या बँक शाखेत, सीएससी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, बँक व्यावसायिक मित्र किंवा बँक सुविधा केंद्रात तातडीने जावे. बँक खात्याशी आधार संलग्न करावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
तर जमा होणार नाही लाभजिल्ह्यातील ज्या महिलांचे खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल त्यांचे खात्यात रक्कम वितरीत करताना अडचण येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र महिलांचे खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नाही, अशा महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये रक्कम जमा होणार नाही.
मोबाइल अॅप बंद, पोर्टलवर अडचणी'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे अर्ज सुरूवातीला 'नारीशक्ती' मोबाइल अॅपवरून भरले जात होते. ऑगस्ट महिन्यापूर्वी हे अॅप बंद करण्यात आले. त्यानंतर पोर्टल सुरू करण्यात आले. पोर्टलवर काही दिवस अर्ज सबमिट होत नव्हते. आतासुद्धा अनेकांना सदर पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अडचणी येत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात तर पोर्टल सुरळीत चालण्यासाठी नेटवर्क समस्या निर्माण होत आहे.
"'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी त्यांचे बँक खाते हे आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तरी ज्या लाभार्थीचे खाते आधार कार्ड संलग्न नसेल किवा खातेदारांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या खात्यावर या योजनेचा जमा होण्यासाठी संबधित महिलांनी आपले खाते ई-केवायसी केल्याची निधी पडताळणी करावी. सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे."- आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.