देसाईगंज (गडचिरोली) : तालुक्यातील आमगाव येथील मुली मकर संक्रांतीच्या पर्वावर वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेल्या असताना तीन मुली नदीत बुडायला लागल्या. त्यापैकी दोघींना वाचविण्यात यश आले तर एक मुलगी पाण्यात वाहून गेली. सायंकाळपर्यंत तिचा शोध सुरू होता.
जान्हवी विश्वास नाकतोडे (११) असे वाहून गेलेल्या मुलीचे नाव असून ती जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकत आहे. तिच्यासह ६ ते ७ मुली बुधवारी सुटी असल्याने मकर संक्रांतीनिमित्त आंघोळ व फराळ करण्यासाठी वैनगंगा नदीघाटावर गेल्या होत्या. त्यापैकी तीन मुली खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागल्या. ही बाब नदीकिनाऱ्यालगत असलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी नदीत धाव घेऊन दोन मुलींना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले, पण जान्हवी हाती लागली नाही. पोलीस व भोई समाजबांधवांच्या मदतीने तिचा शोध घेतला जात आहे.