देसाईगंज (गडचिरोली) : तालुक्यातील डाेंगरगाव (ह.) येथे एक महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह घरातील पाण्याच्या टाकीत आढळला होता, त्यानंतर कुटुंबीयांनी परस्पर अंत्यसंस्कार केले होते. दरम्यान, दोन महिन्यांनंतर या घटनेला धक्कादायक वळण मिळाले. वंशाच्या दिव्यासाठी जन्मदात्यांनीच या चिमुकलीला बळी घेतल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी २९ जूनला आई-वडिलांसह आजी- आजोबा अशा चौघांना अटक केली.
तालुक्यातील डोंगरगाव (ह.) येथील गोपीनाथ प्रधान यांच्या दोन्ही मुलांना दोन मुली आहेत. मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या या कुटुंबातील भास्कर गोपीनाथ प्रधान याची पत्नी निशा ही तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. मार्च महिन्यात तिने गाेंडस मुलीला जन्म दिला. मात्र, दोन्ही मुलांना मुलीच असताना निशाला तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने कुटुंब नाराज होते. २४ एप्रिल रोजी निशाच्या एक महिन्याच्या चिमुकलीला संपविण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. यावेळी तिला घरातील पाण्याच्या टाकीत बुडवून संपविले व नंतर पोलिसांना न कळविताच अंत्यसंस्कार उरकले.
अखेर दोन महिन्यांनंतर २९ जूनला पोलिसांनी आई निशा, वडील भास्कर, आजी सुनीता व आजाेबा गोपीनाथ प्रधान या चौघांना घरातून अटक केली. त्यांना देसाईगंज न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती उपनिरीक्षक सुजाता भोपळे यांनी दिली. बेटी बचाओ, बेटी पढाओचा डंका पिटवला जात असताना अजूनही वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा ही मानसिकता कायम असल्याचे वास्तव या घटनेने उजेडात आले आहे. धक्कादायक म्हणजे पुत्रप्रेमाच्या हव्यासात निष्ठूर झाल्याने माणुसकीला काळिमा फासली गेली आहे.
दोन महिन्यांनी गुन्ह्याला वाचा
चिमुकलीला कुटुंबीयानेच संपविल्याची कुणकुण पोलिसांना लागली. यावरून पोलिसांनी चौकशी केली असता चिमुकली बेपत्ता झाल्याचा कांगावा कुटुंबीयांनी केला हाता. मात्र, पोलिसांसमोर हा कांगावा फार वेळ टिकला नाही. अखेर दोन महिने पोलिसांनी गोपनीयरीत्या तपास केला. यात मुलीची पुत्रप्रेमापोटी कुटुंबीयाने मिळून हत्या केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.