खमनचेरू आश्रमशाळेतील प्रकार : सकाळचा नास्ताही मिळत नाही; पाच शौचालय बंदचअहेरी : अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अहेरीपासून चार किमी अंतरावरील खमनचेरू शासकीय आश्रमशाळेत वसतिगृह अधीक्षिकेने एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे मुलीच्या पायावर सूज आली आहे. २९ जुलैला सातव्या वर्गातील मन्ना सोम्मा मडावी या विद्यार्थिनीला तू न विचारता बाहेर गेली कशी असे म्हणून अधीक्षिका ए. ए. येलेकर यांनी छडीने मारहाण केली. बाहेर जाणारी मुलगी मी नाही दुसरी आहे, असे सांगण्याचा सदर मुलीने प्रयत्न केला तरीही तिला मारहाण करण्यात आली. यानंतर ३१ जुलै रोजी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवळे यांना या घटनेची माहिती मिळाली. १ आॅगस्टला त्यांनी शाळेला भेट दिली व मुख्याध्यापकाशी चर्चा केली. मात्र मारहाण झालेल्या मुलीशी ते बोलले नाही. त्यानंतर शनिवारी पत्रकारांनी या शाळेला भेट दिली असता, शाळेतील पाच शौचालयापैकी एकही वापरण्यास योग्य नाही. त्यामुळे मुले मुली बाहेरच शौचाला जातात. येथे जेवनात अंडी, केळी, पोळी व पौष्टिक आहार तसेच सकाळचा नास्ता मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शासकीय निवास नसल्याच्या कारणावरून बहुतेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. अहेरी, आलापल्लीवरून ते ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. शनिवारी पत्रकारांनी भेट दिल्यावर प्रकल्प अधिकारी सोनकवडे मारहाण झालेल्या मुलीला भेटले व तिची विचारपूस केली. यासंदर्भात प्रभारी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी सहायक प्रकल्प अधिकारी लाटकर यांनी केली आहे. त्या चौकशीच्या आधारे महिला अधीक्षिकेची एक वेतनवाढ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणार आहे, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
वसतिगृह अधीक्षिकेकडून विद्यार्थिनीस मारहाण
By admin | Published: August 02, 2015 1:35 AM