जाहीर सभा : सुधीर मुनगंटीवार यांचे मतदारांना आवाहनंचामोर्शी : केंद्रात विकासाची विहीर आहे, पाणी आणणारे पाईप राज्यात भाजपाचेच आहे, चामोर्शीत तोटी लावायची आहे, ती काँग्रेसची गंजलेली असावी की भाजपची नवी कोरी तोटी लावायची, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. मतदारांनी चामोर्शी नगर पंचायतीत भाजपाचे १७ ही उमेदवार निवडून दिल्यास राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी आणून चामोर्शीला जिल्ह्यातील क्रमांक १ चे सुंदर व स्वच्छ शहर बनविणार, असे आश्वासन देत भाजपाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गुरूवारी चामोर्शीच्या वाळवंटी चौकात आयोजित नगर पंचायत निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, मनोज पालारपवार, रवी बोमनवार, मनोहर पालारपवार, प्रकाश अर्जुनवार, प्रकाश गेडाम, आनंद भांडेकर, आनंद गण्यारपवार, पं. स. सभापती शशी चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, रेखा डोळस, रमेश भुरसे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारची कामगिरी जबाबदार आहे. मात्र काँग्रेसचे नेते भाजपाला बदनाम करीत आहेत. काँग्रेस गरीब माणसाचे साधे बँक बचत खाते उघडू शकले नाही, ते काम भाजप सरकारने प्रथमच केले. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार हे गरीब जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. गरीब जनतेला त्रास देवू नका अशी स्पष्ट ताकीद सर्व प्रशासन व अधिकाऱ्यांना दिली आहे. सत्तेसाठी आम्ही राजकारणात नाही तर लोकसेवेसाठी सत्तेत आहो, इंदिरा आवास योजनेंतर्गत काँग्रेस सरकारने ज्या बीपीएलधारकांजवळ स्वत:ची जागा होती, त्यांनाच घरकूल दिले. मात्र भाजप सरकार सर्व जातीतील बीपीएलधारकांना घरकूल देणार आहे. ज्या बीपीएलधारकांकडे जागा नाही, अशांचे घरकूल उभे राहण्यासाठी राज्य सरकार ५० हेक्टर जागा घेऊन त्यांना घरकूल देणार आहे. काँगे्रसने ६० वर्षांत काय दिवे लावले, याचा हिशेब काँग्रेस नेत्यांनी प्रथम द्यावा, असे खुले आव्हानही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार, मार्र्कंडा देवस्थानाला नियम बदलवून निधी दिला, विरोधात असताना निधी दिला, आता तर सत्तेत आहो, विकासासाठी भाजपाच्या पाठिशी राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा मांडला. आ. डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांचीही भाषणे झालीत.प्रचार सभेचे संचालन रवींद्र ओल्लालवार यांनी केले तर आभार स्वप्नील वरघंटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
चामोर्शी शहर विकासासाठी भाजपाला पूर्ण बहुमत द्या
By admin | Published: October 30, 2015 1:30 AM