गडचिराेली : तालुक्यातील आंबेटाेला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघाची दहशत पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशान्वये शेतकऱ्यांचे शेतावर जाणे-येणे बंद झाले आहे. रखवालीअभावी खरीप हंगामातील धान, तूर व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपाेटी प्रत्येक शेतकऱ्याला राज्य शासनाने ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंबेटाेला गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना शेतकरी पीतांबर साखरे, नीलकंठ भाेयर, संजय साखरे, लक्ष्मण दाणे, पांडुरंग साखरे, कालिदास भाेयर, दुधराम भाेयर, शालिक काेडाप, गजानन ठाकरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित हाेते. रेशीम अळीला पक्षी, मुंगूस, खार यांनी नेस्तनाबूत केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.