गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाण प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आलापल्ली (ता.अहेरी) येथे उपोषण सुरु आहे. आधी आलापल्ली- आष्टी मार्गाचे काम करा व नंतरच लोहखाण वाहतूक करा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.
सुरजागड येथे लॉयड मेटल्स व त्रिवेणी अर्थ मुव्हर्स या कंपन्यांकडून लोहखाण उत्खनन व वाहतूक केली जात आहे. यामुळे रस्ते धुळीने माखले जात असून अपघात वाढले आहेेत. रस्ते खराब असल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, स्थानिक बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य द्या, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सरसकट दहा लाखांची मदत करा, आलापल्ली- आष्टी रस्ता तात्काळ दुरुस्त करा, कंत्राटी पध्दतीने नव्हे तर कायमस्वरुपी नोकरी द्या या मागणीसाठी ३० ऑक्टोबरपासून आलापल्ली येथे चंद्रपूर रोडवरील राममंदिराजवळ बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता, पण अद्याप तोडगा निघालेला नाही.
...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेऊ, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा सोनल वाकुलकर, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश तोर्रेम, शहरप्रमुख अमोल रामटेके आदी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.