निवेदन सादर : नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसह शेतकरी तहसील कार्यालयावर धडकलेलोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली हा पूर्णत: आदिवासी व मागास तालुका आहे. या भागातील शेतकरी शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीला घेऊन नगर पंचायत पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी गुरूवारी तहसील कार्यालयावर धडकले. एटापल्लीच्या नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून कृषी निविष्ठांचे भाव वधारल्याने तसेच शेतीपयोगी कामाच्या मजुरीत वाढ झाल्याने शेती लागवडीचा खर्च प्रचंड वाढला आहे. उत्पादन खर्च वाढला असतानाही उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला हमीभाव देण्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.नायब तहसीलदार एस. एम. सिलमवार यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, नायब तहसीलदार पी. टी. बुराडे, डी. आर. डोर्लीकर तसेच एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2017 1:04 AM