मुख्यमंत्र्यांकडे मागणी : एटापल्लीतील शेतकऱ्यांचे निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : तालुक्यातील अनेक गावे आदिवासी व डोंगराळ भागात वसलेली आहेत. या भागातील शेतकरी अंग मेहनतीने शेती कसत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनावर भरपूर खर्च येत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक शेतकऱ्यांवर कर्ज आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नायब तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता व त्यांच्यावरील बोजा कमी करण्याकरिता कर्ज माफी मिळणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे. निवेदन नायब तहसीलदार सत्यनारायण सीलमवार यांनी स्वीकारले. निवेदन देताना नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, नायब तहसीलदार पी. टी. बुराडे, डी. आर. डोर्लीकर, शेतकरी श्यामराव शेंडे, विठ्ठल शेंडे, नारायण गुरनुले, मोहन मोहुर्ले, बुधाजी शेंडे, गुरूदेव मारगोनवार, वासुदेव गावतुरे, जीवन मोहुर्ले, पुसू मडावी, श्यामराव गुरालवार व एटापल्ली तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या
By admin | Published: June 11, 2017 1:28 AM