महसूलमंत्र्यांना आमदार भेटले : शेतकरी अडचणीत गडचिरोली : अलीकडेच सतत पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, पीडित शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सतत पाच दिवस मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे पऱ्ह्यांचे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. केवळ शेतीच नाही तर पावसामुळे अनेक नागरिकांची घरेही पडली आहे. काही जणांची पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, या मागणीसाठी आ. डॉ. देवराव होळी यांनी मुंबईला जाऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आ. होळी यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व झालेल्या नुकसानीबाबत महसूलमंत्र्यांना अवगत केले. शासन पीडित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांनी नुकसानीबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळवावी, तसेच काही तक्रारी असल्यास आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. डॉ. होळी यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
आपातग्रस्तांना तत्काळ मदत द्या
By admin | Published: July 15, 2016 1:50 AM