लोकसभेत मुद्दा : अशोक नेते यांची मागणीगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव हे पुरातन व प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथील मंदिराजवळून वैनगंगा नदी वाहत असल्याने येथे भाविकांची महाशिवरात्री यात्रेदरम्यान मोठी गर्दी असते, मार्र्कंडादेवचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने मार्र्कंडादेवला केंद्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी १९ जुलै रोजी मंगळवारला लोकसभेत शून्य प्रहरात केली. दरम्यान खा. नेते यांनी मार्र्कंडादेव विकासाचा मुद्दा लोकसभेत आग्रहीपणे मांडून चर्चा घडवून आणली. यावेळी बोलताना खा. नेते म्हणाले, महाशिवरात्री यात्रेदरम्यान दरवर्षी तेलंगणा, छत्तीसगड राज्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास १५ ते २० लाख भाविक मार्र्कंडादेव येथे येतात. मात्र येथे सोयीसुविधा नसल्याने भाविकांना त्रास होतो. मार्र्कंडादेव स्थळाचा विकास घडवून आणण्यासाठी या स्थळाला केंद्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची गरज आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा, टिपागड, वैरागड, अरततोंडी व चंद्रपूर जिल्ह्यातील गायमुख, रामदेगी आदी पर्यटनस्थळी भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात याव्या, अशी मागणी खासदार नेते यांनी केली. या स्थळांकडे जाण्यासाठी पक्के रस्ते बांधावे, असेही ते म्हणाले.
मार्र्कं डादेवला पर्यटन स्थळाचा दर्जा द्या
By admin | Published: July 21, 2016 1:26 AM