काँग्रेसने केली दिल्लीत तक्रार : जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठकगडचिरोली : अनेक वर्षांपासून कैकाडी समाज बांधव शहरात चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालय परिसरात वास्तव्यास आहेत. परंतु या समाजाच्या विकासाकडे व त्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने सध्या कैकाडी समाज हलाखीचे जीवन जगत आहे. कैकाडी समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना १२ मागण्यांचे निवेदन शुक्रवारी सादर करण्यात आले. नगर परिषद क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या कैकाडी वस्तीत शासनाने अद्यापही वीज, रस्ते, पाणी, घरकूल, अंगणवाडी, शौचालय आदी सुविधा पुरविल्या नाही. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या मूलभूत गरजांपासून वंचित राहिल्याने या समाजातील एकही विद्यार्थी पदवीधर झाला नाही व शासकीय नोकरीतही समाविष्ट झाला नाही. या समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, बीपीएल दाखले व व्यवसायाकरिता कर्जही मिळाले नाही. त्यामुळे या समाजातील नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे वस्तीत वीज पुरवठा, पाण्याची व्यवस्था करणे, रस्ते, घरकूल, शौचालय बांधून देणे, भूमिहीन कैकाडी नागरिकांना वहिवाटीसाठी जमीन व शेती साहित्य देणे, व्यवसायाकरिता कर्ज व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, अंगणवाडी केंद्र व समाज मंदिराचे बांधकाम करणे आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, रोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ भडके, हसनअली गिलानी, प्रकाश ईटनकर, शंकरराव सालोटकर, भावना वानखेडे, महेंद्र ब्राह्मणवाडे, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, संतोष खोब्रागडे, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, डी. डी. सोनटक्के, सी. बी. आवळे, पी. टी. मसराम, लहुकुमार रामटेके, रामदास टिकले, शंकर डोंगरे, पुष्पा कुमरे, चंद्रशेखर गडसुलवार, सुनील खोब्रागडे, अमोल भडांगे, एजाज शेख, मिलींद बागेसर, बाशिद शेख व कार्यकर्ते हजर होते.
कैकाडी नागरिकांना न्याय द्या
By admin | Published: September 10, 2016 1:17 AM