अभियंत्यांना निवेदन : वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर नागरिकांची धडक आलापल्ली : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या आरेंदा ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या मिरकल, सकीनगट्टा येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही गावाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने गावे वंचित आहेत. त्यामुळे या दोन गावात वीज पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी नागरिकांनी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर बुधवारी धडक देऊन अभियंत्यांना निवेदन सादर केले.आरेंदा ग्राम पंचायतींतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम मिरकल, सकीनगट्टा या दोन गावात वीज पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र रोष आहे. वारंवार पाठपुरावा करूनही समस्या निकाली न निघाल्याने संतप्त नागरिकांनी विद्यार्थी प्रतिनिधी कैैलास कोरेत यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आलापल्ली येथील कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहे. अतिदुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. परंतु योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे नागरिकांनी धडक देऊन निवेदन सादर केले. निवेदन कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी स्वीकारले. निवेदन देताना कैैलास कोरेत, बाजीराव आत्राम, सिनू कुळमेथे, रैैनू गावळे, पेदू तलांडी, सिन्ना कुळमेथे, साधू कुळमेथे, बिच्चू गावडे, रामदास गावडे, देवाजी मडावी, राजू कुळमेथे, देसू कुळमेथे, राजू गावडे, बेगा कुळमेथे, करपा गावळे, बाजीराव आत्राम सुक्कू आत्राम, रावजी नैैताम, राकेश कोडापे व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
मिरकल, सकीनगट्टाला वीज द्या
By admin | Published: September 30, 2016 1:35 AM