वन विभाग भामरागडअंतर्गत वनपरिक्षेत्र एटापल्ली यांच्याकडून एटापल्ली शहरापासून अर्ध्या किमी अंतरावर एटापल्ली-कसनसूर या मुख्य मार्गावर दहा वर्षांपूर्वी तत्कालीन अधिकाऱ्यांनी वनउद्यान उभारले, या उद्यानात विविध जातींची शेकडो झाडे लावण्यात आली. ते अधिकारी असेपर्यंत दोन-तीन वर्षे वनउद्यानांची देखरेख व्यवस्थित झाली. या उद्यानामुळे एटापल्ली शहरातील लहान मुले, वृद्ध नागरिक कुटुंबासह फिरायला जात असत. या उद्यानामुळे या जागेवर अतिक्रमण झाले नाही.
त्यानंतर राठोड नामक अधिकारी एटापल्लीत आले. त्यांनी या उद्यानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले व काम न करता उद्यानांचा निधी हडप केला, असा आराेप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. उद्यानांची आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. उद्यानाचे तारेचे कुंपण पूर्णपणे टुटले आहे. दिवसभर मोकाट जनावरे उद्यानात फिरल्याने लावण्यात आलेले शेकडो जिवंत झाडे करपून गेली. वनविभागाचे लक्ष नसल्याने या उद्यानात अतिक्रमण वाढत आहे. या उद्यानाला पुनर्जीवित व सुसज्ज करणे, सोंदर्यीकरण करणे, वॉल कंपाउंड, खेळण्याचे साहित्य इतर कामे करण्याकरिता २ कोटी रुपये मंजूर झाल्यास आर्कषक असे वनउद्यान तयार होईल, यात शेकडो झाडे नव्याने लावता येतील, तसेच अतिक्रमण थांबेल व एटापल्लीसह तालुक्यातील नागरिकांना या उद्यानाचा लाभ घेता येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख (शहर) मनीष दुर्गे, शहरप्रमुख राहुल आदे, राघव सुलवावार, प्रसाद दासरवार, संजय जानकी, महेंद्र सुलवावार, निहाल कुंभारे आदी हजर होते.