गडचिराेली : गडचिराेली शहरातील मुख्य मार्केट व जुन्या वस्त्यांकडे आवागमन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकातून मार्ग देण्यात यावा, अशी मागणी व्यापारी संघटना व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार डाॅ. देवराव हाेळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गडचिराेली येथे चंद्रपूर राेड लगत मेन मार्केटलाइन असून बस स्टँड, ऑटो स्टँड, आठवडी बाजार, मच्छी मार्केट, मटण मार्केटशिवाय राष्ट्रीयीकृत बँका आहेत. याशिवाय गांधी वाॅर्ड, हनुमान वाॅर्ड, नेहरू प्रभाग, सर्वोदय प्रभाग, सुभाष प्रभाग आदी प्रभागांतील वस्ती बाजारपेठेलगत आहे. गडचिरोली शहरात एकच मार्केट असून, त्यांना जाण्याकरिता मुख्य मार्ग हा चंद्रपूर रोड येथूनच सुरू होतो. जुन्या वस्तीकडे जाण्याकरिता एकच रस्ता असल्याने समोर एक किमी अंतरावर दुभाजकला मार्ग दिल्याने येथून वाहतूक करणाऱ्या वाहनांना उलट दिशेने जाण्याकरिता एक किमी अंतर पार करून जावे लागत आहे. येथे जाण्याकरिता दुसरा कोणताही मार्ग नाही तरी पतंजली स्टोअर्स ते पूजा फोटो स्टुडिओमधील जाणाऱ्या रस्त्याला दुभाजकाला मार्ग मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आमदारांना निवेदन देताना मनोज देवकुले, प्रफुल बिजवे, भारत भाद्रवान, शेबाज पटेल, ताहरे खान, विश्व हिंदू परिषद पदाधिकारी मुरारी तिवारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फाेटाे : आमदारांना निवेदन देताना व्यापारी व व्यावसायिक.